इराणमधील बंदरात स्फोट   

पाच ठार; ७०० जखमी

तेहरान : दक्षिण इराणमधील एका बंदरात शनिवारी भीषण स्फोट झाला. यामध्ये पाच जण ठार झाले असून, ७०० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती देशाच्या बचाव पथकाचे प्रमुख बाबक महमूदी यांनी सरकारी दुरचित्रवाहिनी दिली. गृह मंत्रालयाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. 
 
जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर प्रचंड ज्वाला आकाशात दिसत होत्या. तसेच, धुराचे लोटही लांबपर्यंत दिसत होते. त्यामुळे, परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर फिरत आहे. त्यातून स्फोटाची दाहकता दिसू येत आहे. बंदर अब्बास शहराजवळील शाहीद राजाई बंदरावरील एका तेल शुद्धीकरण कंपनीत शनिवारी दुपारी हा स्फोट झाला. ही कंपनी वर्षाला  ८० दशलक्ष टन तेलाचे शुद्धीकरण होते. राजाई बंदर हे प्रामुख्याने कंटेनर शिपमेंटचे काम हाताळते. तसेच, याठिकाणी तेलाच्या टाक्या आणि इतर पेट्रोकेमिकल सुविधांचा साठा देखील आहे.  स्फोट खूपच भीषण होता. स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत, असे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितले.  
 
जखमींना होर्मोजगान येथील प्रांतीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, सर्वत्र एकच हाहाकार माजला आहे.स्फोट इतका भीषण होता की कंपनीपासून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या अनेक इमारतींच्या काचा फूटल्या. तसेच, काही भिंतींना तडेदेखील गेले. हा स्फोट तेथील तेलाच्या कंटेनरमुळे झाला, असे सांगितले जाते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अग्निशमन पथके दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इराणमधील पुढील आदेशापर्यंत बंदरातील काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. राजई बंदर हे इराणची राजधानी असणार्‍या तेहरानच्या आग्नेय बाजूस सुमारे १ हजार ५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. हे एक पर्शियन आखाताचे अरुंद प्रवेशद्वार आहे. ज्यातून जगातील २० टक्के तेल व्यापार केला जातो.तेहरानच्या वेगाने वाढणार्‍या अणुकार्यक्रमावर इराण आणि अमेरिका ओमानमध्ये तिसर्‍या फेरीतील वाटाघाटी सुरु असताना हा स्फोट झाला आहे.

Related Articles